आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला हा चिंताजनक अंदाज…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिसऱ्या लाटेची लक्षणे दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे चित्र आहे.

हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत नसले, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते, असा अंदाजही आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला आहे.

दुसऱ्या लाटेत एकूण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जर बाधितांची संख्या जर 60 लाखांवर गेली, तर निश्चितपणे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts