अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्यास मी कारखाना चालविण्यास तयार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे. डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 26 जून 2021 रोजी संपलेली आहे. या संचालक मंडळाला दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कारखान्याच्या गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. कारखाना सुरू करण्यासाठी किमान 10 कोटी रुपये खर्च येतो. कारखाना सुरू करण्यासाठी मी वैयक्तीक घरातून 15 कोटी रुपये खर्च केला आहे. मात्र प्रारंभापासून कारखाना सुरळीत चालला असता तर आज कोणालाही एक रुपयाचीही भीक मागण्याची गरज पडली नसती.
माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी तीन वर्ष कारखाना सुरळीत चालण्यासाठी मोठी मदत केली आहे. मात्र, आता बँक कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य करीत नाही. कारखाना सुरळीत चालू करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च आहे.
तो खर्च आज मी केला आणि ऐनवेळेस राज्य शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली तर हे पैसे परत कोण देणार? त्यासाठी राज्य सरकारने कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली तर शेतकरी, कामगारांसाठी हा कारखाना एकाच महिन्यात सुरू करण्यास वचनबद्ध आहे.
शेतकर्यांकडे कारखान्याची आगाऊ रक्कम मुद्दल व व्याजासह 21 कोटी रुपयांच्या दरम्यान असून हा पैसा वसूल झाला तर कोणत्याही बँकेचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. कारखाना कामगारांनी आजपर्यंत कारखाना सुरळीत चालू करण्यासाठी सहकार्य केले आहे.
यापुढेही कारखाना चालविण्यासाठी कामगारांचे मोठे योगदान महत्वाचे आहे. कामगारांनी गेटबंद आंदोलन केले, हा त्यांचा हक्क आहे. परंतु कारखान्यात राजकारण आणू नये, रात्री काहींना भेटून कारखान्यात राजकारण येत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा खा. डॉ. विखे यांनी दिला.