IMD Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. मध्यंतरी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गणपतीच्या मुहूर्तावर मुसळधार पाऊस (Rain) कोसळायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात हलका पाऊस झाला, तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
यलो अलर्ट जारी
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाच्या संदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सून (Monsoon) आता अंतिम टप्प्यात आला आहे पण अजूनही देशाच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. आजही देशाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील काही दिवस द्वीपकल्प आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, देशाच्या पूर्व भागात 6 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण भारतीय राज्यांमध्येही गडगडाट होण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामानानुसार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर बिहार, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.