अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी झाल्याने विरोधकांनी महानगरपालिकेमध्ये आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विटरवरुन एका जुन्या बातमीच्या आधारे शिवसेनेला टोला लगावला आहे. टि्वटमध्ये प्रसाद लाड यांनी, “ये मुंबई है… ये सब जानती है…” असं म्हणत सामना या वेबसाईटच्या २०१७ च्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे.
या स्क्रीनशॉर्टमध्ये सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २०१७ मध्ये मुंबईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, असं वृत्त दिसत आहे.
“२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार… आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…”, असं ट्विट केलं आहे. शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे.
रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
सकाळी १५ ते २० मिनिटं लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, आता विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली.
“मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?”, अशी शंका उपस्थित करत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.