अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-नगर शहरातही गेल्या काही दिवसांत करोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. मात्र, अनेक नागरिक पुरेशी दक्षता घेताना दिसत नाहीत.
त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक भन्नाट आयडिया वापरली ज्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.यावेळी मनपाने कारवाई पथकासोबत बँड पथक पाठवून मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबपुष्प आणि मास्क देऊन गांधीगिरी केली.
त्यातील कापडबाजार भागातील पथक आज कारवाईसाठी जाताना सोबत एक बँडपथक घेऊन गेले. दंड न करता गांधीगिरी पद्धतीची कारवाई करण्याचे त्यांनी ठरविले. विना मास्क फिरणाऱ्यांना थांबवून त्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले.
त्यांच्या तोंडावर मास्क लावण्यात येत होता. अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच या भागातील माजी नगरसेवक संजय चोपडा हेही कारवाईत सहभागी झाले. बँडच्या तालावर सुरू असलेली ही मोहीम लक्षवेधक ठरली.
रिक्षाचालक, पायी फिरणारे, दुचाकीस्वार यांना थांबवून मास्क दिले जात होते. दरम्यान ‘गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नगर शहरात नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन केले.
तरीही अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले. यामुळे हे अनोखे गांधीगिरी आंदोलन करत नागरिकांना जागृत करण्याचे काम मनपाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली आहे.