Ahilyanagar News:- काल संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले व अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या जिल्ह्यामध्ये नवमतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती व त्याचाच परिणाम हा एकूण बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा वाढलेला टक्क्यांमध्ये झाल्याचे दिसून आले.
त्यामुळे वाढलेला हा टक्का नेमका कोणता उमेदवारांच्या पथ्यावर पडणार? याबाबत मात्र प्रत्येक मतदारसंघांमध्ये विविध चर्चा होताना दिसून येत आहेत. चर्चा कितीही असल्या तरी शनिवारी मतमोजणीनंतर सगळे काही चित्र स्पष्ट होणार आहेच.
परंतु विधानसभेसाठी 2019 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 69.42% मतदान झाले होते व यावेळी मात्र सर्व मतदार संघाची एकूण सरासरी 71.73 टक्क्यांपर्यंत राहिली व त्यामुळे आता नक्कीच या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होतो? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
काल जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांमध्ये काही घटना वगळता मतदार जवळपास शांततेत पार पडले. यामध्ये भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावर झालेला गोळीबार तसेच कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये पैसा वाटपाचे वाद इत्यादी घटना घडल्याचे दिसून आले.
काल जिल्ह्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 61.95 टक्के मतदान झाले होते व त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत टक्केवारीत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले. परंतु वाढलेल्या या मतदानाच्या टक्क्यामुळे विद्यमान आमदारांची धाकधूक मात्र वाढेल हे निश्चित आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते.
कसे होते अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी मतदानाचे चित्र?
जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी बुधवारी 3765 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये जर आपण बघितले तर सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले व सायंकाळी पाच नंतर मात्र शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते.
यावेळी निवडणूक ही विशेष रंगतदार पद्धतीने झाली. महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या नावावर तर महाविकास आघाडीने गद्दार, संविधान बचाओ, वाढलेली महागाई यावर मते मागितल्याचे दिसून आले.
यावेळेस जो काही मतदानाचा टक्का वाढला तो जिल्ह्यातील बाराही मतदारसंघाच्या रिंगणात असलेल्या 151 पैकी कुठल्या लाडक्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार हे मात्र आता शनिवारी मतमोजणी नंतर समजेल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील या घटनांनी मतदानाचा दिवस गाजवला
1- माजी आमदाराच्या वाहनावर झाला गोळीबार- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरामपूर मधील उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावर मतदानाच्या अगदी काही तास अगोदर गोळीबार झाल्याची घटना घडली व यामध्ये ते थोडक्यात बचावले. या सगळ्या गोळीबार प्रकरणामुळे मात्र श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती वेगळ्याच वळणार पोहोचल्याचे दिसून आले.
2- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघामध्ये गोंधळ- अहिल्यानगर जिल्ह्याच्या मतदानाच्या शेवटी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील गोंधळ झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी भाजपच्या महिला आमदार मोनिका राजळे यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या पासून वाचण्याकरिता मोनिका राजळे यांनी समर्थकांसह स्वतःला खोलीत कोंडून घेतले. हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील शिरसाटवाडी या ठिकाणी घडला. शेवटी जेव्हा पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आला तेव्हा या बंदोबस्तात आमदार राजळे या शिरसाटवाडीतून बाहेर पडल्या.
3- काही ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल- अहिल्यानगर जिल्ह्यातील काही ठिकाणी मात्र मतदारांना लक्ष्मी दर्शन केले गेल्याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. शिर्डी मध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी मतदान केल्याचा आणि त्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार प्रभावती घोगरे यांनी घेतल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
तसेच कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामध्ये पैसा वाटपावरून टोकाचे वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
कोणत्या मतदारसंघात झाले किती मतदान?
अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान हे 71.97% इतके झाले तर संगमनेरमध्ये 74.57%, शिर्डीत 74.52%, कोपरगावमध्ये 71.47%, श्रीरामपूर 70.12, नेवासा 79.89, शेवगाव 68.21, राहुरी ७४.५०, पारनेर 66.27%, अहिल्यानगर शहर 63.85%, श्रीगोंदा ७२.२८%, कर्जत जामखेड 75.15% इतके मतदान झाले.