राज्यातील सत्ता नाट्य सुरु झाल्यानंतर आठ दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने तसं पत्रंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. आम्ही 39 आमदार ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत.
त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असं पत्रंच शिंदे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तेच्या हालचालीचं केंद्र राजभवनावर केंद्रीत झालं आहे.
शिंदे गटाच्या या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात याकडेही सर्वच देशाचं लक्ष लागलं आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानीही हालचाली वाढल्या आहेत.
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. 16 आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
गटनेता म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या नरहरी झिरवळांच्या निर्णयाविरोधात स्वतः शिंदे यांनी याचिका दाखल केलीये. सुप्रीम कोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली असून यावर दोन्ही याचिकांवर आज एकाच वेळी सुनावणी होईल.
शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहेत.
एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टातील याचिकेतही त्यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. कोर्टात या मुद्द्यावर सुनावणी सुरू असतानाच आता शिंदे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात आहे.