India News :उत्तर प्रदेशच्या नोएडात असणाऱ्या सुपरटेक ट्विन टॉवर्सना आज पाडण्यात येणार आहे. ट्विन टॉवर ही पाडण्यात येणारी भारतातील सर्वात उंच इमारत असणार आहे.
या इमारतीची उंची १०३ मीटर इतकी आहे. इमारतीच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने टॉवर पाडण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे ती पाडण्यात येत आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता टॉवर पाडले जातील. मुंबईतील एडीफिस इंजिनअरिंगला इमारत पाडण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
ट्विन टॉवर्समध्ये ४० मजले उभारण्याचा प्लॅन होता. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर बाकीचे बांधकाम थांबले. सध्या एपेक्स टॉवरमध्ये ३२ तर सियान टॉवरमध्ये २९ मजले आहेत.
यामध्ये असणाऱ्या ९०० हून अधिक फ्लॅटपैकी दोन तृतियांश फ्लॅट हे बूक करण्यात आले होते. टॉवर्स पाडण्यासाठी ३ हजार ७०० किलोग्रॅम स्फोटकांचा वापर केला आहे.
९ हजारहून अधिक ठिकाणी ही स्फोटके लावण्यात आली आहेत. दर दोन मीटर अंतरावर छिद्रांमध्ये स्फोटके भरण्यात आली आहेत. त्यामुळे जेव्हा स्विच दाबला जाईल तेव्हा एकाच वेळी स्फोट होऊन इमारत कोसळेल.
इमारत ९ ते १२ सेकंदात कोसळेल. इमारत पाडत असताना त्याठिकाणी १०० मीटर परिसरात फक्त दहा लोक असतील. ट्विन टॉवर्सला पाडण्यासाठी जवळपास २० कोटी रुपयांचा खर्च येईल.
ट्विन टॉवर्स उभारण्यासाठी सुपरटेकने २०० ते ३०० कोटी रुपये खर्च केले होते. तर जिथे ही इमारत उभा आहे तिथल्या सध्याच्या दरानुसार दोन्ही टॉवर्सची किंमत १ हजार कोटी रुपयांच्यावर जाते.
ट्विन टॉवर्स पाडताना ३० मीटरपर्यंत हादरे बसतील पण ते काही सेकंदासाठीच असतील. भूकंपाचे हादरे मोजण्याच्या रिश्टर स्केलनुसार हा धक्का ०.४ रिश्टर स्केल इतका असेल.