Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्था, सहकारी बँका यांचा मोठा इतिहास आहे. परंतु अलीकडील काळात यातच अनेक घोटाळे समोर आले आहेत. शहरातील नगर अर्बन व शहर सहकारी बँकेतील गैरव्यवहार राज्यात गाजत आहे.
ठेवीदार अगदी संतप्त झाले आहेत. असे असतानाच वर्षभरात आणखी पाच सहकारी पतसंस्थांमधील घोटाळे समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम शंभर कोटींच्या घरात आहे.
कसे होतायेत गैरप्रकार ?
बनावट सोने तारण ठेवून लाखोंचे कर्ज उचलणे, बनावट खाते तयार करून त्याद्वारे आर्थिक व्यवहार करणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करून शेवटी रोख स्वरूपात काढून घेत गैरव्यवहार करणे आदी प्रकार सध्या पुढे येतायेत.
नगर अर्बन बँकेत जवळपास दीडशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सध्या बोलले जात आहे. तर शहर सहकारी बँकेत तर डॉक्टरांनीच बोगस कर्ज प्रकरणे करून कोट्यावधी रुपये लाटले असून या प्रकरणी सीए विजय मर्दा अटकेत आहे.
हे थोडे म्हणून की काय आता संगमनेर येथील दुधगंगा नागरी पतसंस्थेतील घोटाळा समोर आला आहे. या पतसंस्थेत ८० कोटींचा अपहार झाल्याचे सांगण्यात येत असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
शिडीं मर्चट नागरी सहकारी पतसंस्था, शनी अर्बन मल्टी निधी, जिल्हा सहकारी बँकेची सोनगाव येथील शाखा, राहुरी येथील राजमाता सहकारी पतसंस्था आदींमधील घोटाळेही आता पुढे आले आहेत.
तपासाचे रेंगाळणारे काम व ठेवीदारांचा जीव टांगणीला
सहकारी बँका व पतसंस्थांतील गैरव्यवहाराचा तपास गुंतागुंतीचा असल्याने या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी बराच वेळ लागतो. नगर अर्बन बँकेचा तपास दीड वर्षे उलटूनही पूर्ण झालेला नाही.
इतर संस्थांनी गैरव्यवहाराचा अद्याप छडा लागलेला नाही. तसेच दुसरीकडे अर्थिक गैरव्यवहार झालेल्या संस्थांचा कारभार ठप्प झाला आहे. काही संस्थांना तर कुलूप लावण्यात आलेले आहेत.
ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. त्यामुळे अनेक सर्वसामान्यांची घरगुती कामे ठप्प झाली आहेत. पैसे मिळतील की नाही या विचाराने ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
हे नवीन घोटाळे समोर
जिल्हा सहकारी बँकेची सोनगाव शाखेतील १ कोटी ७१ लाख, राजमाता पतसंस्था मधील ७ कोटी ३७ लाख, शनी अर्बन जवळे मल्टी निधीमध्ये ४३ लाख ५३ हजार, सैनिक सहकारी बँकेतील १ कोटी ७९ लाख,
शिर्डी मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थामधील ४३ लाख, संगमनेर येथील दुधगंगा नागरी पतसंस्थेत ८० कोटी ८९ लाखांचा घोटाळा आदी घोटाळे समोर आले आहे.