Vinayak Mete : शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण (reservation) मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे जात असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रसायणीजवळ त्यांचा गाडीचा अपघात झाला होता.
आज त्यांच्यावर बीड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, माझं लेकरु मराय सारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, त्याची चौकशी करा, असं म्हणत या माऊलीने एकच टाहो फोडला. “माझं लेकरु हे अपघातात गेलं नाही, माझ्या लेकराला मुद्दाम केलंय. यांनी सुरक्षा कशी दिली नाही. माझी विनंती आहे की तुम्ही चौकशी करा. माझ्या लेकरांन मुंग्याच्या वारुळावर पाय दिला.
माझं लेकरु मराय सारखा नव्हता. लई पावरबाज होता, यांनी जाणून बुजून माझं लेकरु मारलं. गरिबाचं लेकरु होतं. त्यांनी आमदारकी, मंत्रीपद द्यायचं नव्हतं पण त्यांनी माझं लेकरु मारायचं नव्हतं. कोर्टात येते मी, मी अडाणी बाई, माझं डोंगर पेटलं आहे”, असं म्हणत विनायक मेटेंच्या आईंना अश्रू अनावर झाले.