अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अमेरिकेने अफगाणिस्तानात मोठी लष्करी कारवाई केली आहे. काबूल स्फोटाचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इसिसच्या दहशतवाद्यांविरोधात एअर स्ट्राईक केला. अमेरिकेने ड्रोनद्वारे अफगाणिस्तानमध्ये ‘एअर स्ट्राईक’ केला.
‘एअर स्ट्राईक’ करुन आयसिस – के संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे अमेरिकेने सांगितले. हल्ल्यात काबुलमध्ये स्फोट करण्याची योजना आखणारा आयसिस – के संघटनेचा दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकेने सांगितले. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात मोठा कल्लोळ माजला आहे.
त्यातच काबूल विमानतळ दोन स्फोटांनी हादरल्याची धक्कादायक घटना घडली. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले.
मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे संतप्त झाले होते. ‘या हल्ल्यांची किंमत चुकवावी लागणार असून आम्ही हे विसरणार नाही आणि आता दहशतवाद्यांच्या चुकीला माफी नाही.
आम्ही दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करू. अफगाणिस्तान राहत असलेल्या आमच्या नागरिकांना वाचवू’, असे जो बायडेन म्हणाले होते. आयसिस – के ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात कार्यरत आहे.
याच प्रांतात अमेरिकेने ‘एअर स्ट्राईक’ केला. ‘एअर स्ट्राईक’मध्ये किती दहशतवादी ठार झाले याची नेमकी आकडेवारी अद्याप अमेरिकेने जाहीर केलेली नाही.