अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- भाजपनेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपाचे नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे.
हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटलांच्या या चॅलेंजमुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपा आमनेसामने येणार हे नक्की… दरम्यान किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.
पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली, अशी माहिती देखील जगदीश मुळीक यांनी दिली. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता.
यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या 12 आरोपींना पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने प्रथम आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र बचाव पक्षाच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. प्रत्येकी साडेसात हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर अटक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर केला.