अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. सदरची कारवाई नगर शहरातील झेंडीगेटच्या कसाई गल्लीत करण्यात आली आहे.
दरम्यान जप्त करण्यात आलेली सदर जनावरे इसळक (ता. नगर) येथील सृष्टी गोपालन संस्थेत सोडण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, झेंडीगेटला कत्तलखाने सुरूच असून कोतवाली पोलिसांकडून तेथे कारवाई करण्यात येत आहे.
आठ जनावरे कत्तलीसाठी आणून डांबून ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकाने पहाटे झेंडीगेटच्या कसाई गल्लीतील एका वाड्याजवळ छापा टाकून आठ गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
जमील अब्दुल सय्यद (रा. घासगल्ली, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांनी फिर्याद दिली आहे.