मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटीवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत काय चर्चा झाली याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, लक्षद्वीपच्या मुद्द्यावरुन आपण मोदींना भेटलो.
तसंच विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती आणि संजय राऊतांवरील कारवाईचा मुद्दाही पंतप्रधान मोदींसमोर आपण उपस्थित केला असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांना संगितले आहे.
या भेटीवरून सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना पत्र दिलं होतं. आतापर्यंत 17 आरोप त्यांनी माझ्यावर केले आहे. त्यासंदर्भात पवारांनी चर्चा केली असेल.
तसंच ठाकरे सरकारनं एसआयटी नेमली आहे. मात्र, कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, अशी माहितीही पवारांनी मोदींकडे दिली असेल असा खोचक टोला किरीट सोमय्यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांना लगावला आहे.
चबरोबर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते लुटतात, घोटाळे करतात आणि त्यांचे घोटाळे बाहेर आले की आरोप करतात. संजय राऊत 1 हजार 40 कोटीच्या घोटाळ्यात पूर्णपणे सापडले आहेत.
पत्राचाळ प्रकरणात गरिबांना एकही घर मिळाले नाही. मात्र, त्याचा एफएसआय कोट्यवधी रुपयांना प्रवीण राऊत आणि राकेश वाधवान यांनी विकला. आता संजय राऊत यांचाही तपास होणार. असेही सोमय्या म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या यांनी ईडी बाबतही भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांकडे कोणतेही पुरावे नाहीत. आता ते INS विक्रांतबाबत बोलत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत.
स्टंटबाजी संसदेत चालत नाही. ईडीवर आरोप केले जातात. मग ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं का देत नाहीत? असा सवालही सोमय्यांनी संजय राऊतांना केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारतात, शिव्या देतात. पण काय फरक पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना घोटाळ्याची उत्तरं द्यावीच लागणार. श्रीधर पाटणकर, संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केलीय.
आता आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई होणार. एसआयटीच्या कितीही धमक्या दिल्या तरी किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी शिवसेनेला दिला आहे.
यशवंत जाधव यांच्यावर कारवाईबाबत भारत सरकारनेही तक्रार केलीय. ज्यांनी चोरी, लबाडी केली त्यांच्यावर कारवाई होणारच. विक्रांतच्या नावाने आरोप करा, किरीट सोमय्याला देशद्रोही म्हणा, जे काही बोलायचे ते बोला पण तुमचे घोटाळे बाहेर काढणारच असा गंभीर इशाराही सोमय्यांनी दिला आहे.