अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- रात्री तसेच पहाटेच्या वेळेस अकोले शहरातील जुनी महालक्ष्मी कॉलनी परिसरातून दोन तीन दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असल्याने नागरिकांमधून काळजीबरोबरच मोठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः रात्री साडेअकरा वाजताच्या नंतर आणि पहाटे साडेपाचच्या दरम्यान तीन बिबट्यांचा नागरी वस्तीतून मोकळा वावर असतो. वनविभागाने गांभीर्य ओळखून तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सध्या शहरात कडक लॉकडाऊन असून रात्री ८ वाजताच्या सुमारासच रस्त्यावर शुकशुकाट असतो. अगस्ती कारखान्याचा गाळप हंगाम संपल्याने रानंही आता मोकळी आहेत. महालक्ष्मी कॉलनी परिसरील रस्तेही निर्मनुष्य असल्याने बिबट्याचा मुक्त संचार वाढला.
आता तर या परिसरातून बिबट्यांची संख्या तीनने वाढली असल्याचे जाणकार व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्या अगदी बंगल्यात कंपाऊंडवरून उडी मारुन येऊ लागले. रस्त्याने बिबट्याचा वावर वाढला असून काही घरांसमोर ओट्यांवर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे परिसरातील सीसीटीव्हीतून दिसते.