Ahmednagar News: केवळ राजकारण म्हणून जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी उपोषणाचा इशारा देऊन ते तालुक्यातील प्रश्नांवरील लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत.
यापूर्वी कधीही नव्हती इतकी दुरावस्था तालुक्यातील रस्त्यांची झाली असून हे रस्ते तात्काळ दुरूस्त करून आमदार लंके यांनी स्वतःचे कर्तव्य बजवावे. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी खा. सुजय विखे हे सक्षम आहेत. त्यासाठीच जनतेने त्यांना खासदार म्हणून संसदेत पाठविले आहे.
तुम्ही तालुक्यापुरते पहा. अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केली आहे. जिल्हयातील शिर्डी तसेच पाथर्डी रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून,
प्रवासी तसेच विविध गावांमधील नागरिकांनी मोठया प्रमाणावर तक्रारी करूनही या रस्त्यांची दुरूस्ती होत नसल्याबद्दल आमदार नीलेश लंके यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. रस्त्यांची कामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या रस्त्यांच्या कामावरून आ. लंके यांनी खा. सुजय विखे यांना लक्ष्य करीत खराब रस्त्यांचा त्रास नको म्हणून खासदार हेलीकॉप्टरने प्रवास करीत असल्याची टीकाही आ.लंके यांनी केलेली आहे. त्यावर आ. लंके यांनी खा. विखे यांच्यावर केलेल्या टीकेला विखे यांचे खंदे समर्थक राहुल शिंदे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या रस्त्यांची कामे झाली पाहिजेत यासाठी खा. सुजय विखे हे पाठपुरावा करीत आहेत. लवकरच ही काम मार्गी लागणार आहेत. त्यासाठी आंदोलनाची भाषा वापरणाऱ्या नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील रस्त्यांबाबत बोलावे.
हे रस्ते दुरूस्त करून स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना दिलासा द्यावा.जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आंदोलन करण्याआगोदर आपल्या तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पहावी अशी टीका शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आता आ. लंके यांच्या आंदोलनास त्यांच्याच तालुक्यातुन विरोध होत असल्याचे समोर आले आहे.