अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राचं कवित्व अजूनही सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या पत्राचा मसुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरला आहे, असा गाैप्यस्फोट केला आहे.
पत्रातील विसंगती :-
दमानिया म्हणाल्या, की सध्याच्या डिजिटल युगात कुणी पत्र लिहितं का? व्हॉट्सअप, फोन, मेसेज करतो; पण आमदाराकडूनच असं पत्र लिहिलं गेले. त्यानंतर ते मीडियात आलं. हे सगळं हास्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे असे आहेत, ज्यात एकीकडे महाविकास आघाडीत शिवसेनेचा छळ केला जातोय म्हटलं जातं, तर दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीतील नेत्यांचे संबंध तुटले नाहीत. ते तुटण्याआधी जुळवून घ्यावं. हे सगळं मोदी-ठाकरे भेटीनंतर घडलं आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही. त्यांची देहबोली बदलली आहे.शिवसेनेत दोन गट :- इतकंच नाही, तर शिवसेनेत सध्या दोन गट तयार झाले आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा तर दुसरा गट संजय राऊतांचा आहे. संजय राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावं असं वाटतं, तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपसोबत जावं असं वाटतं आहे. कोणतीही विचारधारा आणि तत्व नाहीत. केवळ पैसा एकमेव कारण आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.
सरनाईक यांच्याविरोधात सबळ पुरावे :- सरनाईक यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे ते तपासातून बाहेर पडू शकत नाहीत; मात्र राजकारण पाहता शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत असं दमानियांनी म्हटलं आहे.