अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- नेवासे तालुक्यातील चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ग्रामपंचायतीने गावातील सर्व व्यवहार, व्यवसाय, शाळा दहा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
यामुळे सर्वांनी दुकाने व इतर व्यवसाय बंद केल्याने बाहेरील गावाहून आलेल्या नागरिकांचे हाल झालेे. चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्ण संख्या १३ च्या पुढे जात असल्याने ग्रामपंचायतीने १४ ऑक्टोबरपर्यंत सर्व व्यवहार सकाळी ८ ते ११ या वेळेत चालू राहतील व ११ नंतर सर्व बंद राहणार नियमांचे उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदार रुपेश सुराणा, गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, कामगार तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ रजनीकांत पुंड, जिल्हा परिषद शाळा, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यापारी, ग्रा. प. संरपच ज्योती जावळे, उपसंपच चांगदेव दहातोंडे आदी उपस्थित होते.
४ एप्रिल २०२१ लाही ग्रामपंचायतने सात दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला होता. त्यावेळी कोरोना रुग्ण वाढले होते. आता चांदा ग्रामपंचायतीने पुन्हा लाॅकडाऊन केल्याने छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे शाळा महाविद्यालय चालू झाले आहेत परंतु चांदा येथे विद्यालय, प्राथमिक शाळा असे मिळून जवळपास २० हजार विद्यार्थी सोमवारपासून शाळेत येऊ लागले आहेत. आता चांदा बंद मुळे या शाळांचे काय असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे.