अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-लोक मास्क घालत नाहीत. लग्न समारंभ,राजकीय सभांमध्ये नियमांचे पालन केले जात नाही.लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, अन्यथा दुबई,
युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
तसेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आराखड्यासाठी विभागवार बैठक सोमवारी विभागीय अायुक्तालयात पार पडली.
यावेळी हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्यमंत्री टोपे यांची स्वतंत्र पत्रकार परिषद झाली परंतु राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने उभय मंत्र्यांनी एकाच सुरात नागरिकांच्या बेफिकीरीवर कडक शब्दात मत मांडले.
यावेळी शिवजयंतीच्या मुद्यावर भावनिक राजकारण करु नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले. बंधने कुठेच आणता कामा नये मात्र नागरिकांचा जीव वाचवणे आणि कोरोना वाढू नये हे देखील तितकेच महत्वाचे आहे.असे अजित पवार म्हणाले.