LPG Price : देशात मागील काही दिवसांपासुन एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एक एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. अशातच आता ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. ही घसरण 171 रुपयांची झाली आहे. दरम्यान मागील महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही घसरण फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
तेल कंपन्यांच्या मते, देशातील 4 महानगरांमध्ये ही कपात 171.50 रुपये इतकी आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू केले आहेत. नवीन दर जाहीर झाल्यानंतर आता राजधानी दिल्ली येथे 19 किलोचा गॅस सिलिंडर 2028 रुपयांऐवजी 1856.50 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
मार्चमध्ये वाढल्या होत्या किमती
नवीन दर लागू झाल्यानंतर, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती आता कोलकाता येथे 2132 रुपयांऐवजी 1960.50 रुपये तसेच मुंबई येथे 1980 रुपयांऐवजी 1808.50 रुपये झाल्या आहेत. मार्चमध्ये तेल कंपन्यांकडून एका झटक्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 350 रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात 92 रुपयांनी कपात केली असून आता मे महिन्यात पुन्हा एकदा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.