अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.
मंदिरातील वीणेकरी केशव कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय 66) यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले.
प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे, सौ. ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांत अधिकारी सचिन ढोले तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळालेले केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून एकटेच पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहे.
त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. त्यांना चंदा आणि नंदा नावाच्या दोन मुलीही आहेत. ते वीस वर्षांपासून माऊलींच्या सेवेत आहेत.