अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 Electricity News : राज्यात सध्या ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर वीज भारनियमन सुरू झाले आहे. याविरूद्ध नागरिकांचा रोषही वाढू लागला आहे.
सरकारकडून कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या माहितीतून वेगळीच माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे आता नेमकी कोणती वीज केंद्र कोळशाअभावी बंद आहेत, याची माहिती जाहीर केली जावी, अशी मागणी पुण्यातील सजग नागरिक मंचाने अध्यक्ष तथा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे. वीज कंपन्यांच्या वेबसाईटवरील माहिती पाहून वेलणकर यांनी हा दावा केला आहे.
त्यांनी सांगितले की, या माहितीवरून अस दिसते की १,८४१ मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प आहे. महावितरण आणि महापारेषण यांच्याकडून उपलब्ध माहितीनुसार सध्या वापरात असलेल्या वीजनिर्मिती केंद्रांपैकी नऊ केंद्र बंद असल्याचे म्हटले आहे. मात्र, यापैकी एकही वीजनिर्मिती केंद्र कोळशाच्या अभावामुळे बंद नाही.
उरण येथील तीन केंद्र गॅसच्या तुटवड्यामुळे बंद आहेत, तर १०८ मेगावॉट क्षमतेचे एक केंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. तारापूर येथील १६० मेगावॉट क्षमतेची दोन केंद्रे तांत्रिक कारणामुळे जवळपास दोन वर्षांपासून बंद आहेत. ती अजून एक वर्ष तरी सुरू होणार नसल्याचे नमूद केले गेले आहे.
घाटघर येथील १२५ मेगावॉट क्षमतेचे जलविद्युत केंद्र तांत्रिक बिघाडामुळे दोन महिन्यांपासून बंद आहे. कोराडी येथील ६६० मेगावॉटचे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र एक आठवड्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे, तर खासगी उद्योगाचे ३०० मेगावॉटचे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र एक महिन्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समोर आले आहे. त्यामुळे सरकारने नेमकी स्थिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.