ताज्या बातम्या

Maharashtra Politics : अजित पवार म्हणतात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार !

Maharashtra Politics : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील बॅलाई पियर येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आला.

राष्ट्रवादीची दोनदिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पक्षबांधणीच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना दिली.

बुधवारी बैठकीचा दुसरा टप्पा पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. कोल्हापूर, इचलकरंजी, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक, दिंडोरी या १० लोकसभा मतदारसंघांचा मंगळवारी, तर कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, भंडारा, गोंदिया, जळगाव, रावेर, बुलढाणा, रायगड, मावळ, बारामती या १२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा बुधवारी घेण्यात आला.

२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढलेला २२ लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. दोन दिवस चाललेल्या आढावा बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांतील पक्षाच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन कामाला लागण्याच्या सूचना पवारांनी दिल्या.

पूर्वी आपण काँग्रेससोबत लढत होतो, आता महाविकास आघाडीत तीन पक्षांचा समावेश आहे. आणखी काही समविचारी पक्षांचा आघाडीत समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार यात तुम्ही पडू नका आणि जागावाटपांचीही चिंता करू नका. ते काम तिन्ही पक्षांतील आम्हा वरिष्ठावर सोडा आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी तुम्ही झोकून द्या आणि कार्यकत्यांना कामाला लावा, अशा सूचना पवारांनी या आढावा बैठकीत उपस्थित नेत्यांना दिल्या.

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र – अजित पवार

पुढील वर्षी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी केला. १९९९ प्रमाणे महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील अशी माहिती आहे, असे पवार यांनी सांगितले.

तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास चांगलेच होईल. सरकारी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यासोबत आर्थिक बचतही होईल, असे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts