Maruti Suzuki: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या 9,000 हून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. वास्तविक, या गाड्यांमध्ये मोठा बिघाड झाल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. त्यांचे निराकरण केल्यानंतर कंपनी त्यांना परत पाठवेल. यामध्ये कंपनीच्या तीन मॉडेल्सचा समावेश आहे.
9925 युनिट्स परत बोलावल्या –
पीटीआयच्या मते, देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने मागील ब्रेक असेंब्ली पिनमधील (brake assembly pin) संभाव्य दोष दूर करण्यासाठी तीन मॉडेल्स परत मागवले आहेत. मागे घेण्यात आलेल्या मॉडेल्समध्ये वॅगन आर (Wagon R), सेलेरियो (Celerio) आणि इग्निस (Ignis) यांचा समावेश आहे. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, एकूण 9,925 युनिट्स दुरुस्तीसाठी परत घेण्यात येणार आहेत.
ब्रेक असेंब्ली अयशस्वी –
यासंदर्भातील माहिती मारुती सुझुकी इंडियाने कंपनीच्या वेबसाइटवरही शेअर केली आहे. असे सांगण्यात आले आहे की, मागील ब्रेक असेंबली पिन पार्टमध्ये संभाव्य दोषामुळे तीन हॅचबॅक कार परत बोलावल्या जात आहेत. या भागात दोष असल्याने गाडी चालवताना खूप आवाज होतो. त्याच वेळी, या दोषामुळे, कारच्या ब्रेकची कार्यक्षमता दीर्घकाळात कमी होऊ शकते.
कंपनीकडून असे सांगण्यात आले की, या बिघाडामुळे काही परिस्थितींमध्ये पिनचा भागही तुटू शकतो आणि त्यामुळे मोठा आवाज होऊ शकतो. या अहवालात कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही प्रभावित कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अधिकृत कार्यशाळा याबाबत ग्राहकांशी संपर्क साधतील आणि तपासणीअंती बाधित वाहनांमधील दोष मोफत दुरुस्त करण्यात येतील.
मारुतीला मोठा नफा –
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मारुती सुझुकीच्या कारच्या विक्रीतील वाढीचा परिणाम त्याच्या निव्वळ नफ्यावर देखील दिसून येतो. कंपनीने यापूर्वी जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर नजर टाकली तर कंपनीच्या नफ्यात 4 पट वाढ झाली आहे. एमएसआयएलचा (MSIL) निव्वळ नफा वाढून रु. 2,112.5 कोटी झाला आहे.