अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नेवासे रोडवरील मंगल कार्यालयांना तालुका पोलिस आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या पथकाने संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई केली.
रोहयोचे उपायुक्त अर्जुन चिखले हे टाकळीभान येथे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना येथील मंगल कार्यालयात गर्दी दिसली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्याचा सूचना दिल्या.
त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शाम गाडेकर, अनिल शेंगाळे आणि श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग,
भोकरचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमने, भामाठानचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने यांनी ही कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याने भोकर शिवारातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला,
तर वरपक्ष व वधूपक्षाकडून एक-एक हजाराचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने श्रीरामपूर तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईला सुरवात केली आहे.
यासाठी शहर व तालुका पोलिसांनी तसेच पंचायत समितीने पथके तयार केली असून, पोलीस व पंचायत समितीच्या पथकाने भोकर येथील मंगल कार्यालयांवर धाड टाकली, यावेळी मंगल कार्यालय चालकांची व आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली.