‘लस खरेदीसाठी मनपानेही ग्लोबल निविदा काढावी; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  महापालिकेने शहरात लसीकरण सुरू केले आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘लस खरेदीसाठी मुंबईप्रमाणेच अहमदनगर महानगरपालिकेनेही ग्लोबल निविदा काढावी.

अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक आपल्या निधीतून लस खरेदी करण्यासाठी तयार आहेत, अन्य पक्षाचे नगरसेवक तयार असतील तर त्यांनाही हा निधी उपलब्ध करून द्यावा.

तसेच या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात जगताप यांनी म्हटलं आहे की, ‘नगर शहरात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मृत्यू दरही वाढलेला होता.

त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. नगर शहरात मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमार्फत लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. पण शहराची लोकसंख्या पाहता उपलब्ध होणारी लस अत्यंत कमी प्रमाणात आहे.

त्यामुळे लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. संग्राम जगताप यांनी लस खरेदीसाठी महापालिकेला आवाहन करत असताना स्वत:चा आमदार निधीही या कामासाठी देणार असल्याचं सांगितलं आहे.

‘लस उपलब्ध करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर लसीचे १५ लाख डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध कराव्यात.

ते खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शन घेऊन डोस खरेदीची ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध करण्यात यावी,’ अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts