अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. “अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे.
ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे” असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते.
हे नंबर अनोळखी होते, हेच सिमकार्ड बुकी नरेश गोर याने उपलब्ध करुन दिले असण्याची शक्यता आहे. या सर्व कटाचे सूत्रधार सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले आहेत.
हिरेन यांच्या हत्येच्या कटात 11 जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे. या सर्व कटाचे सूत्रधार अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (असल्याचे ठोस पुरावेही एटीएसला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष चार ते पाच जण उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, या ठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता, असंही तपासात समोर आलं आहे.