अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मॅट्रीमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि कस्टममधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केली.
गुरुवारी (दि. १०) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. देव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली.
फिर्यादी यांच्याशी लग्न करायचे आहे,असे आरोपी डॉ. देव याने सांगितले. त्याने फिर्यादी यांच्यासाठी विदेशातून पार्सल पाठवल्याचे सांगितले.
त्यानंतर आरोपी हमजा हिने फिर्यादी यांना फोन करून डॉ. देव याने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी आपण कस्टम विभाग दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून १ लाख २५ हजार ५०० रुपये घेतले.
पैसे घेऊनही फिर्यादी यांना पार्सल मिळाले नाही. त्यामुळे फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.