अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar news :- राहुरी खुर्द परिसरातील एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे पालक वर्गाला चिंता लागली आहे.
विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथून एका 13 वर्षीय व एका 15 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली.
दरम्यान राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढू लागल्या असून यापूर्वीच्या एकाही घटनेचा तपास लावण्यात राहुरी पोलिसांना यश न आल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत नागरिक संतप्त झाले आहेत.
तसेच या घटनांमुळे पालकवर्ग देखील दहशतीखाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत ती 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासह राहत आहे.
दि. 25 मार्च रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान ती मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.
अखेर त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
त्यांच्या फिर्यादीवरून संशयित म्हणून आरोपी ज्योती अमोल भोसले, रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी तसेच शंतनू खंडागळे, रा. श्रीगोंदा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.