अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- दुसऱ्या बैठकीचे कारण सांगून आमदारांच्या बैठकीस उपस्थित न राहिलेल्या शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे या चांगल्याच संतापल्या.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आमदार राजळे यांनी या प्रकरणाची विभागीय आयुक्त, महसूलमंत्री व जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली. दरम्यान शेतवाग्व तालुक्यामध्ये लांबलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती, आरोग्य सुविधा,
लसीकरण, भविष्यात कोविडचा प्रसार होऊ नये याकरिता उपायोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, विविध विकास कामे तसेच महसूलमधील प्रलंबित कामे आदी विषयांवर तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्याची सूचना प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना आ. मोनिका राजळे यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली. त्यानुसार सर्व विभाग प्रमुख तसेच प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित राहिले. आ. मोनिका राजळे 2 दिवसीय अधिवेशनाचे कामकाज संपवून बैठकीसाठी पहाटे मुंबईवरून निघाल्या व मीटिंगपूर्वी पोहोचल्या.
या वेळी तहसीलदार अर्चना पागिरे जिल्हाधिकार्यांच्या बैठकीस नगरला गेल्याचे त्यांना समजले. मात्र त्यांनी केलेल्या चौकशीत अशी कोणतीही मिटिंग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर नाराजी व्यक्त करत आ. राजळे यांनी तहसीलदारदारांच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त नाशिक विभाग व महसूल मंत्री यांना पाठवले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शेवगावच्या तहसीलदार पागिरे या विविध कारणामुळे वादाच्या केंद्रबिंदू बनल्या आहेत. मध्यन्तरी एकाने तहसीलदारांच्या कारभार विरुद्ध उपोषण देखील केले होते. यातच खुद्द आमदार मॅडमने आता तहसीलदारांवर कारवाई करावी अशी मागणी केल्याने पागिरे यांच्या अडचणीत भर पडली आहे.