अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- मागील चार-पाच महिन्याच्या काळापासून अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच भाष्य केले होते.
परंतु याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, पालकमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे. त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही.असे सांगत पालकमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेला ब्रेक दिला आहे. राज्यात विस्ताराने सर्वाधिक मोठा आणि जागरूक असलेला नगर जिल्हा आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली.
जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री नात्याने मुश्रीफ महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत न्याय देण्याची भूमिका ते सातत्याने पार पाडत असल्याचे आ. पवार म्हणाले.
मागील काही काळापासून रोहित पवार यांच्या मंत्री पदाविषयी देखील जिल्ह्यातील तसेच राज्यातील समर्थकांकडून मागणी लावून धरण्यात येत आहे. याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी आपल्याला कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.
या मतदार संघातील सर्व स्तरातील नागरिकांचे अलोट प्रेम आणि समर्थन या बळावर विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आमदार म्हणून या मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत.
तसेच राज्यभरात देखील पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार लोकांच्या आशा-आकांक्षा जाणून घेत आहोत. विकासाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महाविकास आघाडी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
मंत्रीपद किंवा सरकार मधील मोठे पद याबाबत पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ निर्णय घेत असतात. पक्षश्रेष्ठींनी सोपवलेली जबाबदारी पार पाडणे हीच आपली भूमिका आहे. सोपवलेले काम आपण निष्ठेने पार पाडत राहू.असेही ते म्हणाले.