अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही.
हा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
दरम्यान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. तांबे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी आहेत.
त्यांच्या शिक्षणाकरता शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहेत. विविध क्षेत्रातील कर्मचार्यांना सातवा आयोग लागू झाला आहे, मात्र दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही.
यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व दिव्यांग शाळेतील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्यांना सातवा वेतन लागू केला
जाईल तसेच या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ज्युनिअर कॉलेजही राज्यात लवकर सुरू करण्यात येतील असेही ते म्हणाले.
डॉ. तांबे यांच्या आग्रही मागणी बद्दल राजभरातील अपंग व मतिमंद मूकबधिर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आ. डॉ. तांबे यांचे अभिनंदन केले आहे.