अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अन्याय झाल्यावर दुसऱ्या पक्षात पलटी मारण्याच्या आपल्या आपल्या विधानावरून टीका सुरू झाल्यानं खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले होते, ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो आणि आमच्यावर अन्याय झाला तर मिनिटात पलटी मारतो.’
आता यावर त्यांनी खुलासा केला आहे की, ‘माझे ते विधान मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविताना ज्या पध्दतीनं अन्याय झाला, हे आपण सांगत होतो.
मात्र याचा विपर्यास करुन, वेगळे अर्थ काढले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये आपण समाधानी आहोत,’ असंही डॉ.विखे पाटील यांनी म्हटलं आहे.