अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-राज्यात सध्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेल्या विकासकामांचे प्रदर्शन जोरात सुरु आहे. अनेक बडे नेतेमंडळी देखील यावेळी आवर्जून भेटीगाठी घेत आहे.
केलेल्या कामाचा जोरदार गाजावाजा करत आगामी निवडणुकीसाठी आपले जाळे पसरवत आहे. एकीकडे राज्यात ही परिस्थिती असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यातील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी मात्र एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे.
दरम्यान विखे यांच्या या निर्णयाची चर्चा राजकारण्यांमध्ये रंगली आहे. पुढील निवडणुकीला सामोरे जाताना शेवटच्या वर्षांत लोकप्रतिनिधींकडून भूमिपूजनांच्या कार्यक्रमांचा धडका लावला जातो.
त्या आधारे अनेक आश्वासने देत निवडणूक लढविली जाते. मात्र, नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या परंपरेला छेद देणारा संकल्प केला आहे. ‘जी काही कामे करायची ती चार वर्षांतच करायची.
शेवटच्या वर्षी एकाही कामाचे भूमिपूजन करायचे नाही. केलेल्या कामांचा हिशोब मांडून पुढील निवडणुकीला सामोरे जायचे,’ असा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले, ‘यावेळचा अर्थसंकल्प वेगळा आहे. करोनामुळे सगळे संदर्भ बदलले आहेत. तरीही अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
त्याचा फायदा आपल्या मतदारसंघाला कसा करून घ्यायचा, यासाठी प्रयत्न करणार आहे. नगर जिल्ह्यात रस्त्याची अनेक कामे मार्गी लागली आहेत. या कामांसाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले नाही.
त्यामुळे होता होईल तेवढा केंद्रातून निधी आणून ही कामे मार्गी लावली आहेत. तसेच दर तीन महिन्याला एका केंद्रीय मंत्र्याला मतदारसंघात आणण्याचा आपला प्रयत्न आहे.
एप्रिल महिन्यात मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथसिंह यांच्यापासून याची सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात एका कार्यक्रमासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही जिल्ह्यात निमंत्रित करण्यात आले आहे.
मतदारसंघातील रस्त्याचे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले असून आता पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार आहोत,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.