अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं.
मात्र, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली. त्यावरून आता चंद्राकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे.
“माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही. ते आमचे चांगले मित्र आहेत. आपल्या मित्राला आपलं नाव घेतल्यानंतर चांगली झोप लागत असेल, तर मित्रासाठी त्याला माझी हरकत नाही”, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.
हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक सल्ला दिला आहे.
“हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार. पण ही त्यांची कार्यपद्धती आहे. अलिकडच्या काळात इतके घोटाळे समोर येतात, की १०० कोटींचा दावा ही फार छोटी रक्कम आहे.
त्यांनी जरा ५००, १००० कोटी रुपयांचा दावा ठोकला पाहिजे. शिवाय अब्रू नुकसानीचा दावा करायला कोर्टात स्टॅम्पसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. तेवढे व्हाईट पैसे आहेत का हे पाहावं.
कारण ब्लॅक मनी तिथे चालत नाही. मग हा पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार, हेही त्यांनी सांगावं”, असं पाटील म्हणाले.