ताज्या बातम्या

पवार साहेबांनी मला सवय लावली, बारामतीत या, कसे काम असते बघा; अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात (Pune) गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. यावेळी पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.

हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी अनेक जुन्या आठवनींना उजाळा दिला आहे.

ते म्हणाले, की मला वर बघून छान छान म्हणायला आवडत नाही. काही गोष्टी मला सांगायला पाहिजे. राजकरणात (politics) येण्यापूर्वी मी हे सर्व केले आहे. गाईची धार काढली आहे. आम्हाला याच्यातील बारकावे माहिती आहेत. मात्र आता खूप बदल झाला आहे. देशी गाईच्या गोमूत्राला, तुपाला तसेच खव्याला महत्त्व आले आहे.

अलीकडे पॅकिंगला (packing) खूप महत्त्व आहे. ते कसे चांगले होईल, यावर भर द्यायला हवा. दुधाचे भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) गणित बिघडत असते. यामध्ये सातत्य नाही. मात्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच मला पहिल्यापासून सकाळी लवकर कार्यक्रम घेण्याची सवय लागली. बारामतीत (Baramati) तर सहाची वेळ दिली, तरी लोक येतात. आम्हाला पवार साहेबांनी (Sharad Pawar) सवय लावली, ती आम्ही टिकवत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. तर त्या त्या भागातील वातावरणाशी जुळवून घेतील, अशा गाई इकडे आणल्या गेल्यात.

वेगळ्या वेगळ्या भागात असे प्रदर्शन भरवू. मला मे शेवटपर्यंत सांगा आपल्याला काय लागणार ते, असे ते यावेळी म्हणाले. निधीची कमतरता असेल तर राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार, मात्र गरज असेल तेवढेच मागा, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.

दरम्यान, वरती लाल कार्पेट आणि खाली जमिनीची लेव्हल केली नाही. एखाद्या रानात चालतोय असेच वाटत आहे. गोरे गोमटे होण्यासाठी काहीतरी करायचे. बारामतीत या, कसे काम असते बघा, अशी अधिकाऱ्यांची शाळा अजित पवारांनी घेतली. गोठ्यांच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts