अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या ६८५ कोटीच्या अंदाजपत्रकात २१ कोटी ६५ लाखांच्या वाढीव तरतुदींची शिफारस करत एकूण ७०६ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी मंगळवारी (दि.३०) दुपारी महासभेपुढे सादर केले.
महापौर वाकळे यांनी अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी नगरसेवकांना वेळ मिळावा म्हणून सभा तहकूब केली असून सभेचे नियमीत कामकाज आज बुधवारी (दि.३१) दुपारी १ वाजता सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा मंगळवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी स्थायी समितीत झालेल्या चर्चेनुसार वाढीव तरतुदींच्या शिफारशी केलेले अंदाजपत्रक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे सादर केले.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त शंकर गोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण मानकर, उपायुक्त प्रदीप पठारे व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती घुले म्हणाले,
प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने शहरातील नागरिकांच्या गरजे नुसार सुधारणा करुन शिफारशी केल्या आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे.
उत्पन्नवाढीसाठी नवीन घरांना घरपट्टी लागू करणे, ज्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांची नोंदणी अद्याप महापालिकेकडे झालेली नाही त्यांची नोंदणी करुन मालमत्ता कराची आकारणी सुरू करणे,
मालमत्ता हस्तांतरण फी, गाळे भाडे, जाहिरात बोर्ड, अनधिकृत बांधकाम नियमीत करणे, थकीत मालमत्ता कर वसुल करणे, शहरात आवश्यक त्या ठिकाणी पे ॲण्ड पार्कींगची व्यवस्था करणे, अनधिकृत बांधकामांचा तसेच नळ कनेक्शनचा शोध घेऊन ते नियमीत करणे,
भाडेतत्वावर दिलेल्या शाळा खोल्यांचे भाडे वसुल करणे यावर भर देणे आवश्यक आहे. चितळे रोड वरील नेहरू मार्केटच्या ठिकाणी अद्ययावत शॉपींग कॉम्प्लेक्स, प्रोफेसर कॉलनी चौकात शॉपींग मॉल उभारणे, सावेडी गावठाण,
गंजबाजार या ठिकाणी जुन्या भाजी मार्केटच्या जागी नवीन भाजी मार्केट बांधणे, अद्ययावत सराफ बाजार उभारणे, टिडीआरच्या माध्यमातून मोक्याच्या जागा विकसीत करणे. सावेडी, बोल्हेगाव,
नागापूर या उपनगरांमधील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी सावेडी येथील प्रभात बेकरी मागील १५ हजार स्क्वे. फुट जागेमध्ये ए.आर.च्या माध्यमातून महापालिकेचे अद्ययावत रुग्णालय उभारणी करणे,
केडगाव येथे महावितरण उपकेंद्रा शेजारी महापालिकेची अंदाज ३ एकर जागा असून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल अशा प्रकारचे क्रीडा संकुल विकसीत करणे,
पिंपळगाव माळवी येथील ७०० एकर जागेवर पर्यटनाच्यादृष्टीने विकास आराखडा तयार करुन या दोन्ही कामांसाठी आ. संग्राम जगताप यांच्या मार्फत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करणे यासह विविध शिफारशी या अंदाजपत्रकात स्थायी समितीने केल्या असल्याचे सभापती अविनाश घुले यांनी यावेळी सांगितले.