ताज्या बातम्या

नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या, पद टिकवण्यासाठी भूमिका बदलली; रोहित पवार

जालना : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपचा (Bjp) वाद चांगलाच पेटत असून या वादात आता मनसेने उडी घेतल्याची दिसत आहे. तसेच मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या (ethanol project) उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnneet Rana) आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचे पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवे असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी. तसेच निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे, असे रोहित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टार्गेट केले जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.

लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरले जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असेलल्या वादात आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही उडी घेतली असून राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले होते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts