राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात झालेल्या फुटीनंतर राज्याचा दौरा सुरु केला असून लवकरच शरद पवार यांची नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. तसे संकेत त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर दिले आहेत. तसेच नगर जिल्ह्यात चिंता नसावी, असेही ते म्हणाल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले,
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवार हे लवकरच नगर दौऱ्यावर येणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नगर जिल्ह्याची खडानखडा माहिती असल्याने नगर जिल्ह्यात चिंता नसल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे अभिषेक कळमकर यांनी सांगितले. शरद पवार यांची पुढील महिन्यात सभा होण्याची शक्यता आहे.
नगर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरात सभा होण्याची शक्यता असल्याचे कळमकर यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची फळी उभी करून पक्ष संघटना बळकट करण्याच्या सूचना शरद पवार यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या.
टंचाईप्रश्नी आवश्यक तेथे रस्त्यावर उतरण्याचे निर्देशही दिले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे झालेल्या या बैठकीस खा.सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, निल देशमुख, राजेश टोपे, एकनाथ खडसे उपस्थित होते.
या बैठकीस नगरचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह जिल्ह्यातून आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, नामदेव पवार आदी उपस्थित होते.