कर्तव्यात हलगर्जीपणा ; दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीसा !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोविड काळात कर्तव्यात हलगर्जीपणा, मुख्यालयास न राहणे तसेच विना परवानगी गैरहजर राहणे या कारणावरून संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डामसे यांना तहसीलदारांनी, तर वैदयकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.

याच प्रश्नी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डामसे यांना बजाविलेल्या नोटीसीत म्हटले आहे की,

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दि. २० एप्रिल रोजी भेट दिली असता आपण मुख्यालयास राहत नसल्याचे निदर्शनास आले. कोविड केअर सेंटर प्राथमिक शाळा येथे भेट दिली असता समुदाय आरोग्य अधिकारी,

आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेवक महिला यांची ड्युटीप्रमाणे उपस्थिती आढळून आली नाही. त्यामुळे सदर कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

सदर कोविड केअर सेंटरमध्ये २० रुग्ण दाखल असून वडगावपान येथील दोघा रुग्णांची स्थिती अत्यवस्थ असूनही त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून घेतले तसेच डीसीएचसी सेंटर घुलेवाडी येथे संदर्भित केले नाही ही बाब रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे.

याप्रकरणी वडगावपान ग्रामपंचायतचे सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे या आजारी असल्याचे समजले मात्र त्यांचा कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज तालुका आरोग्य कार्यालयात सादर केलेला नाही अथवा आपण तसे वरिष्ठ कार्यालयास अवगत केलेले नाही.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तीन दिवसात खुलासा सादर करावा, खुलासा असमाधानकारक असल्यास भा.द.वि. कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५६ अन्वये कारवाई केली जाईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

संगमनेर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे यांना बजाविलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, दि. २० एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,

तळेगाव व कोविड केअर सेंटर, तळेगाव येथे भेट दिली असता आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. आपण सदर दिवसाचा कोणत्याही प्रकारचा अर्ज कार्यालयास सादर केलेला नसून विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे स्पष्ट होते.

आपण आपल्या अधिनस्त कोविड केअर सेंटरला भेटी दिल्याचे आढळून आले नाही. यावरून आपण आपले दैनंदिन कामकाजात हलगर्जीपणा करीत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे विनापरवानगी गैरहजर दिवसाची विनावेतन का करू नये, याबाबत तीन दिवसात खुलासा करावा, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts