मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचे एक जुने पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक केले होते. भाजपचे नेते निलेश राणे यांनीदेखील हे पत्र शेअर केले असून शरद पवारांवर टीका केली आहे.
पवार साहेबांचे राजकारण किती खालच्या पातळीचे असू शकते याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचे लिखाण चुकीचे वाटू लागले आहे. याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.