Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी कारमधील एअरबॅग्सबाबत (airbags) मोठी घोषणा केली आहे.
त्यांनी माहिती दिली की सरकारने 1 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून सर्व आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची योजना होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली
नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, मोटार वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षा त्यांच्या किंमती आणि व्हेरियंटपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. गडकरींनी लिहिले, “जागतिक पुरवठा साखळीतील वाहन उद्योगाला येणाऱ्या अडचणी आणि त्याचा आर्थिक पैलूंवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, प्रवासी कारमध्ये (M-1रेंज) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव 01 ऑक्टोबर 2023 पासून मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर ते म्हणाले, “भारतातील बहुतांश ऑटोमोबाईल उत्पादक 6 एअरबॅगसह कार निर्यात करतात परंतु भारतात त्याच वाहनांना दोन किंवा 4 एअरबॅग दिल्या जातात.”
एअरबॅग वाढवल्याने कारच्या किमतीत मोठी वाढ होणार नाही, असे ते म्हणाले होते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं ही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर सरकारने वाहनाच्या पुढील तसेच मागील सीटच्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक केले होते.