गडकरी कारखाना खरेदी-विक्रीत नियमबाह्य व्यवहार झालेला नाही…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   सक्तवसुली संचालनालयाने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या वांबोरी (ता. राहुरी) येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या समोरील 4.6 एकर जमीन व नागपुरातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त केली आहे.

दरम्यान नागपूर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना खरेदी-विक्रीत नियमबाह्य व्यवहार झालेला नाही. मात्र, तसा ठपका ठेवून ईडीने मालमत्ता जप्तीच्या केलेल्या कारवाईविरुद्ध न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल, असे प्रसाद शुगर अ‍ॅण्ड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि. वांबोरी साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक विकास आभाळे यांनी स्पष्ट केले आहे.

ईडीने मंत्री तनपुरेंच्या मालकीच्या वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या समोरील 4.6 एकर जमीन व नागपुरातील गडकरी कारखान्याची 90 एकर जमीन जप्त केली आहे.

गडकरी कारखान्याचे मूल्य 26.32 कोटी रुपये असताना त्याची प्रसाद शुगरला केवळ 12.95 कोटी रुपयांना विक्री झाली असा ठपका ठेवून ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली.

दरम्यान आता त्यावर प्रसाद शुगरची बाजू मांडताना सरव्यवस्थापक आभाळे म्हणाले, सन 2006 साली राज्य सहकारी बँकेने गडकरी साखर कारखाना विक्रीची निविदा सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यात कारखान्याच्या राखीव किंमतीचा कोणताही उल्लेख नव्हता.

प्रसाद शुगर कारखान्याने 12.95 कोटी रुपयांची निविदा भरली होती. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने निविदा स्वीकारून मंजुरी दिल्याने व्यवहार प्रक्रिया पूर्ण झाली.

त्यात बँकेचा कुठलाही तोटा झालेला नाही. गडकरी कारखान्याला राज्य शासनाने दिलेल्या कर्जाच्या थकहमीपोटी राज्य सहकारी बँकेला 52 कोटी व कारखाना विक्रीचे 13 कोटी रुपये असे 65 कोटी रुपये मिळाले.

त्यामुळे बँकेचा कुठलाही आक्षेप नाही. परंतु 2007 साली बँकेने खासगी व्यक्तीकडून गडकरी कारखान्याचे केलेले मूल्यांकन 26.32 कोटी निघाले. त्यानुसार 13.41 कोटी रुपये कमी किंमतीत व्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

प्रसाद शुगरने बँकेला तीन वर्षे विलंबाने कारखाना खरेदीचे पेमेंट दिले. ते साठ दिवसांत अदा करणे आवश्यक होते. असाही ईडीचा ठपका आहे.दरम्यान ईडीच्या कारवाईविरुद्ध न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल. सर्व पुराव्यानिशी ईडीचे मुद्दे खोडून काढले जातील, असेही आभाळे यांनी प्रसाद शुगरतर्फे स्पष्ट केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts