अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. भोंगाप्रकरणावरून ठाकरे यांना घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य सरकारच्या हाती ठाकरे यांच्याविरूद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पडले आहे.
औरंगाबादमधील सभेत अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे यांच्या विरोधात आताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या वॉरंटची पोलिस अंमलबजावणी करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
सांगलीमधील शिराळा कोर्टाने ठाकरे यांच्याविरूद्ध हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. मनसेतर्फे २००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती.
या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.
याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये ६ एप्रिल २०२२ रोजी हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.