अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-भाजप नेते डॉ किरिट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनमधील राखीव खेळाडू हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आज सक्त वसुली संचलनालयात जावून पुराव्यांसह तक्रार अर्ज दाखल केला.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan यांच्यावर सोमय्यांनी हवाला मार्गे व्यवहार केल्याचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबत सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे आयकर विभागाला दिल्याचे सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले की,“ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावे मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावे आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावे होती.
आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे” . सोमय्यांनी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ईडीसोबत ४० मिनिटे चर्चा झाली. ईडीने हसन मुश्रीफांच्या विरोधातील पुरांव्यासह केलेल्या २७०० पानांच्या तक्रार अर्जाबाबत चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.
१२७ कोटींच्या मनी लॉन्ड्रींगची माहिती मिळाली आहे. मुश्रीफांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या खात्यामध्ये संशयास्पद व्यवहार झाले आहेत.