अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून माजी आमदार वैभव पिचड यांनी अर्ज मागे घेतल्याने काहींनी त्यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला.
राजूर येथे एकत्र येत आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला. त्या वेळी पिचड बोलत होते. या वेळी, पिचड हेच आमचा पक्ष असल्याचे सांगत,
राज्यातील आदिवासी समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहून भविष्यकाळात प्रत्येक निवडणुकीत एकीचे बळ दाखवून देईल, असे उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना पिचड म्हणाले, मी भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. भाजपच्या बड्या नेत्यांनी मला अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्रिपद देऊन सन्मान केला.
या पदाचा उपयोग करून तळागाळातील आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचे काम करणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेत गेलो नाही, याचे मला मुळीच दुःख नाही. मात्र, वाईट प्रवृत्तीबाबत मनात सल आहे.
त्याला उत्तर काळ व वेळच देईल. मात्र, तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, राहतील, यात तिळमात्र शंका नाही. त्यांना यापुढील काळात ताकद देण्याचे काम करू.