Marathi News : चंद्रावर पहिले कोण पाऊल ठेवतो, अशी शर्यत रंगली होती. यात अमेरिका आणि रशिया या मातब्बर शक्ती सहभागी होत्या. आता अशीच शर्यत पुन्हा रंगलीय. तीही चंद्रावरूनच. चंद्रावर पहिला तळ कोण ठोकते, यावरून अंतराळाचे स्वामित्व कुणाकडे या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये रंगलेल्या या शर्यतीचा मात्र दोन्ही देशांच्या गुप्तचरांनी चांगलाच धसका घेतला आहे. दोन्ही देशांकडून या मोहिमेत सहभागी होऊ शकतील अशा सोबत्यांच्या शोधात ते आहेत. यात सध्याच्या घडीला तरी चीनने आघाडी घेतली आहे.
यावर अमेरिकेच्या गुप्तचरांनीही शिक्कामोर्तब केले आहे. चीन अमेरिकेच्या पुढे आहे, हे त्याच्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळ स्थानकाच्या उभारणीवरूनच स्पष्ट झाले. या दशकाच्या शेवटापर्यंत चीनला कसेही करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तळ उभारायचा आहे.
त्याअगोदर म्हणजेच २०२५ मध्ये चांद्रभूमीवर मानव उतरवण्याची योजना अमेरिकेची आहे. ही मोहीम एक वर्षाने पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याने अमेरिकेला २०३० पर्यंत चंद्रावर तळ उभारणे कठीण जाणार आहे. त्याकरिता संशोधक ही मोहीम ठरल्याप्रमाणे वेळेत सुरू करण्याबाबत काहीसे ठाम आहेत.
नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांच्या म्हणण्यानुसार, चीन २०३५ पर्यंत चांद्रभूमीवर पाऊल ठेवेल. कदाचित त्याअगोदरही चीन चंद्रावर पोहोचेल. त्यांच्यामुळे या मोहिमांना शर्यतीचे स्वरूप आले आहे. आम्ही त्यांचे आव्हान गांभीर्याने घेत आहोत.
चीनने २०१५ मध्ये अंतराळ क्षेत्रात खासगीकरण आणले. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार वेगाने झाला. असे असले तरी अमेरिकेच्या तुलनेत चीनची अंतराळ शक्ती काहीशी कमकुवतच म्हणावी लागेल.
एकीकडे असे चित्र असले तरी चीनने एकहाती स्वतःचे अंतराळस्थानक बांधून जगाला आश्चर्यात टाकले, याकडे डोळेझाक करून चालण्यासारखे नाही. याशिवाय क्वांटम आणि दळणवळण क्षेत्रातही चीन मुसंडी मारू पाहात आहे.