अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात सादर केले आहे.
मात्र जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.
आता बाळ बोठेसमोर उरले दोनच पर्याय !
सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने बोठेचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करणे अथवा पोलिसांना शरण येणे एवढे दोन पर्याय बोठेसमोर आहेत.
पारनेर न्यायालयाने यापूर्वीच बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केले आहे. या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देणारा बोठेने केलेला अर्ज फेटाळत पारनेर न्यायालयाने जारी केलेले स्टँडिंग वॉरंट जिल्हा सत्र न्यायालयाने कायम केले.
गेल्या ३० नाहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकाचा फोटा जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना तात्काळ जेरबंद केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली.
त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहीती पुढे आली. त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.
पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा आजूनही फरारच आहे. त्याच सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.