Maharashtra news : आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, आपण मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा आहे, अशी वक्तव्य यापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर मोठी चर्चाही झाली होती. पुढे मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.
आता अशाच प्रकारातील एक वक्तव्य मुंडे यांनी केले आहे. ‘मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे,’ असे मुंडे एका मुलाखतीत म्हणाल्या. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही त्या म्हणाल्या. एका बाजूला राज्यसभेसाठी रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्र विधान परिषदेचीही पोट निवडणूक जाहीर झाली आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक अशा जागा नक्की असून एका जागेसाठी चुरस आहे.
तर दुसरीकडे मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपूर्वी पराभव झाल्यावर त्या पक्षापासून दुरावल्या. त्या बंडखोरी करणार, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा जोमाने पक्षाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांचा आता विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी विचार केला जाऊ शकतो, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते.