अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- आधीच कोरोनामुळे मागील एक वर्षांपासून सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात परत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. एकीकडे कोरोनाने पुरते जेरीस आणले असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळाने त्यात भर टाकली आहे.
हे सर्व कमी होते म्हणून की काय आता म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेकांना ग्रासले आहे. एकूणच काय तर कोरोना महामारीत कोरोनाबाधितांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. कोरोनातून रूग्ण बरा झाल्यानंतर त्याचा जुना आजार वाढत असल्याचं संशोधनातून समोर आले होते.
काही दिवसांपुर्वा कोरोना रुग्णांना ब्लॅक,व्हाईट व येलो फंगस या बुरशीजन्य आजाराचा धोका वाढत असून सध्या महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे ४हजारहून अधिक रूग्ण आहेत. यातच आता एका नव्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे.
सध्या ‘एस्परगिलोसिस’ नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. गुजरातमध्ये या आजाराचे ८ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना झालेल्या काही लोकांना गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात या नवीन बुरशीजन्य संसर्गाचे ८ रुग्ण आढळले आहेत. कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या सायनसमध्ये बुरशीजन्य संसर्ग होताना दिसत आहे.
एस्परगिलोसिस हा आजार सामान्यतः इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतो, परंतु सायनसमध्ये एस्परगिलोसिस फारच कमी आढळतो, असं डॉ. शीतल मिस्त्री यांनी सांगितले.